विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
उल्हासनगर
संचारबंदीत गरजूंना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना अनेकांकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे गर्दीचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. तसेच, समाजसेवेच्या नावाखाली अनेक स्वयंघोषित समाजसेवक मंडळी अतिरेक करित आहेत. अशा अतिउत्साही समाजसेवकांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आता पोलिस दक्ष झाले आहेत. सामाजिक संस्थांव्यतिरिक्त इतरांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी पोलिसांची परवानगी अत्यावश्यक असून विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी दिले आहेत.
संचारबंदीमुळे हजारो कामगारांचे रोजगार बंद झाल्याने गोरगरीब कुटुंब, बेवारस नागरिक आणि आदिवासी भागांमध्ये दोन वेळचे जेवण मिळवण्याची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे समाजातील अशा घटकांसाठी सरकार, स्थानिक प्रशासकीय संस्था आणि अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत हजारो नागरिकांना अन्नधान्य, दोन वेळचे जेवण आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. मात्र प्रशासन गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन करत असताना शहरी भागांमध्ये मात्र सामाजिक संस्थांव्यतिरिक्त अनेक अतिउत्साही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि स्वयंघोषित समाजसेवक करोनाबाबतच्या कुठल्याही उपाययोजनांची दक्षता न घेता नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना गर्दी करताना आढळून येत आहेत तसेच, अनावश्यक वस्तूंचे वाटप करताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून सोशल मीडियावर टाकण्यासाठी फोटोसेशन आणि गर्दी करण्यात येत आहे. त्यामुळे समाजातील गोरगरिबांना मदत करण्याचा उद्देश जरी सफल होत असला तरी अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा अतिउत्साही समाजसेवकांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत असून 'सामाजिक अलिप्तता' राखली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचारबंदीचा मूळ हेतूच फोल ठरत आहे.