जिल्ह्यातील महापालिकांच्या आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं तात्काळ काढावीत- मुख्यमंत्री

जिल्ह्यातील महापालिकांच्या आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं तात्काळ काढावीत- मुख्यमंत्री



ठाणे


जिल्ह्यातील महापालिकांच्या आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं तात्काळ काढावीत तसंच पुन्हा अतिक्रमणं झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिका-यावर निश्चित करून कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. 


जिल्ह्यातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो अशा विविध विषयांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह मुख्य सचिव तसंच जिल्हा परिषद अध्यक्षा, स्थानिक आमदार, सर्व संबंधित विभागांचे सचिव, महापालिका आयुक्त आदी या बैठकीला उपस्थित होते.


मीरा-भाईंदरच्या पाण्यासाठी चेन्ना नदीचे पाणी अडवून शहराला देता येईल का, याचा अभ्यास करावा. घोडबंदर, मीरा-भाईंदर खाडीकिनारा विकास अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेटीचा विकास, शहरामध्ये कोस्टल आणि उन्नत रस्ते, झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन, समूह पुनर्विकास अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. सफाई कामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम करण्याच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.


माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव असून त्यासाठी आवश्यक तरतूद करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. शहापूरला बाहुली प्रकल्पाचं पाणी गुरूत्व पध्दतीने मिळावं यासाठी कार्यवाही करावी तसंच घाटणदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावं असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.