पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिक्षाचालकांना या मास्कचे वाटप

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिक्षाचालकांना या मास्कचे वाटप



ठाणे :


‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षाचालकांना जिल्हा प्रशासनातर्फे ५०० मास्क देण्यात आले. राज्याचे नगरविकासमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी ठाणे स्थानकात रिक्षाचालकांना या मास्कचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यावेळेस रिक्षाचालकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. या संदर्भात एकता रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता, दोन-दोन रिक्षाचालकांना बोलावून मास्कचे वाटप केले जात होते, असा दावा त्यांनी केला.


 ठाणे जिल्ह्य़ामध्ये ‘करोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा तसेच महापालिका आरोग्य यंत्रणांनी परदेशातून प्रवास करून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरामध्येच वेगळे राहण्याच्या (गृहअलगीकरण) सूचना दिल्या आहेत. विविध महापालिकांची आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत असून आतापर्यंत जिल्ह्यात २२ जणांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली असून त्यांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी सात जणांना करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.


ठाणे जिल्ह्यात आढळून आलेल्या करोना रुग्णांमध्ये कल्याण आणि नवी मुंबईतील प्रत्येकी तीन, तर ठाण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. परदेशातून प्रवास करून आलेल्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्य़ात परदेशातून प्रवास करून आलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या १६१ जणांना घरात राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. त्यापैकी २२ जणांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य आणि महापालिका यंत्रणा सज्ज झाल्या असून त्यासाठी त्यांनी गर्दीची ठिकाणे र्निजतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे.