परदेश प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन पाळावे -- जिल्हाधिकारी
ठाणे
परदेश प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी 14 दिवस घरीच होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार विमानतळावर करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येत आहे. ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जात आहे. ए मध्ये थेट लक्षणे दिसणे प्रवासी, बी मध्ये वयस्कर प्रवासी आणि कुठलीही लक्षणे न दिसणारी सी कॅटेगरीमध्ये आहेत. ए आणि बी मधील प्रवाशांची चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर लक्षणे न दिसणाऱ्या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना शिक्का मारून होम क्वॉरंटाइन सांगितले जात आहे.
होम क्वॉरंटाइन केल्या जाणाऱ्या लोकांना निवडणुकांच्या वेळी मतदान केल्यानंतर लावली जाते तशा पद्धतीच्या शाईचा शिक्का मारला जात आहे. हातावरील शिक्क्यावर होम क्वॉरंटाइन कधी पर्यंत असणार आहे हे नमूद केले आहे. या नागरिकांनी मुदत असणाऱ्या दिनाकापर्यंत घराबाहेर पडणे टाळावे. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अडचण भासल्यास अथवा लक्षणे आढळल्यास जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा. आपल्या घरी वैद्यकीय पथकामार्फत प्राथमिक तपासणी करण्यात येईल. कृपया सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर टाळावा. सार्वजनिक,घरगुती समारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. बाहेरील व्यक्ती बरोबरच आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीपासून दूर रहा. जास्तीजास्त काळजी घ्या असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.
शासनाने ह्या लोकांना होम क्वॉरंटाइन केलेलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांना शिक्के मारलेले असल्याने कळणार आहे. होम क्वॉरंटाइन केलेले लोक फिरताना दिसल्यास यासंबंधित शासकीय यंत्रणेला माहिती द्यावी. परतू याबाबत दहशत घेवू नये तसेच संबधित व्यक्तीला त्रास होईल असे कुठलेही वर्तन करू नये असे आवाहन श्री नार्वेकर यांनी ठाणे जिल्हावासीयांना केले आहे.