गुढी पेक्षा जीवन महत्त्वाचे...
ठाणे
कोरोनाशी लढाई सुरू असल्याने हा गुढीपाडवा जरा वेगळा आहे. सण साजरा करण्यापेक्षा आरोग्य महत्त्वाचे असल्याने मंदिरांमध्ये जाऊन देवाच्या पाया पडण्यापेक्षा स्वत:चा जीव वाचवणे महत्वाचे ठरले आहे. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी वैज्ञानिक अविष्कार अर्थात फोन, सोशल मीडिया याचीच आता साथ लाभत आहे. मुंबई ठाण्यासह विविध ठिकाणी शोभायात्रा निघते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदा कुठेही शोभायात्रा होणार नाही.
स्वत:च्या भल्यासाठी असले निर्णय घेण्यात आल्याने तो पाळणे महत्त्वाचे आहे, असे अनेकांनी आवर्जून सांगितले. सण साजरा करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी नंतर दसऱ्यालाही विचार करता येईल, असेही सांगण्यात आले. लोकांच्या या घराबाहेर न जाण्याच्या निश्चयाला पाठिंबा दर्शवत अनेकांनी घरी उपलब्ध साहित्यातून गुढी उभारा, असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार होती. मात्र विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती, त्यासाठी आवश्यक काळजी म्हणून ही जनजागृतीही करण्यात येणार नसल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे.