आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी अबोली रिक्षा

आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी अबोली रिक्षा



ठाणे :


देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठीही वाहने उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २५ अबोली रिक्षा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना दूरध्वनीद्वारे या रिक्षांसाठी मागणी नोंदवता येईल. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची शहरातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.सध्या संचांरबंदीच्या काळात सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे रिक्षा चालकांचा रोजगार बुडत आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे ठाणे शहरातील अबोली महिला रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.


करोना विषाणूचा संसर्ग देशभरात फोफावत असल्याने केंद्र संरकारतर्फे २१ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच या संचारबंदीच्या काळात रिक्षा, टॅक्सीच्या सुविधाही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे आजारी व्यक्तींना दवाखान्यात जाताना अडचणी येत असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत असून आजारी व्यक्तींना त्यांच्या घराजवळचा दवाखाना गाठता यावा यासाठी प्रशासनातर्फे लवकरच रिक्षा सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रिक्षा सेवेची सुरुवात ठाणे शहरातून करण्यात येणार असून यासाठी शहरातील विविध रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती जिल्हाप्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या सेवेमध्ये सुरुवातीला २५ अबोली महिला रिक्षा चालकांचा समावेश असणार आहे. या रिक्षा चालकांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार असून फोनद्वारे या सेवेसाठी नोंदणी करता येणार आहे. या सेवेचा वापर करणाऱ्यांना रिक्षाचे भाडे आकारले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे  देण्यात आली आहे.