कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना टेस्टींग लॅबची गरज- आ.राजू पाटील
कल्याण :
राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. कोरोना टेस्टिंग लँब नसल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथे टेस्टिंगसाठी जावे लागत आहे, परंतु तेथील लॅबमध्ये टेस्टिंग रुग्ण जास्त आहेत, त्यामुळे अहवाल येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व परिसरातील लोकसंख्या पाहता इथेही लॅब असणे आवश्यक आहे, त्यामुळे याठिकाणी कोरोना टेस्टिंगसाठी नवीन प्रायव्हेट लॅबला परवानगी देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यात डोंबिवलीत आणखी एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च कडून कोरोना टेस्टसाठी नवीन आठ खाजगी लॅबला परवानगी देण्यात आली आहे. यातील चार लॅब मुंबईमधील आहेत. तर नवी मुंबई २, ठाणे १ आणि पुणे १ अशा लॅब देण्यात आल्या आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातही कोरोना बाधित रुग्ण वाढताना दिसत आहेत. डोंबिवलीमधील रुग्ण सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.