जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा मंडळांचा निर्णय



ठाणे


  करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून तसेच सार्वजनिक हिताच्या व आरोग्याच्या दृष्टीने   गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी  स्वागतयात्रा संयोजकांना केले होते. या आवाहनाला सर्व आयोजकांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून यंदा शोभायात्रा अथवा अन्य कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे मान्य केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व  स्वागतयात्रा आयोजक मंडळे, प्रवासी कंपनी, मॉल्स चालक, चित्रपट गृहे, नाट्यगृह यांचे मालक यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला आ. गणपत गायकवाड अपर पोलीस आयुक्त  अनिल कुंभारे,निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपायुक्त बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकार डॉ. मनीष रेंगे आदी उपस्थित होते.


या बैठकीस  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री नार्वेकर म्हणाले जिल्ह्यामध्ये होणारा कोरानाच फैलाव थांबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.सध्याची स्थिती पाहता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे


सर्व सर्वांजनिक संस्था , मंडळे यांनी  शहरांमध्ये  धार्मिक कार्यक्रम, मेळावे यांचे आयोजन  करू नये. अथवा काही कालावधी साठी पुढे ढकलण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. सर्व मंडळ आणि संस्था यांनी जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद दर्शविला. सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने हे आवाहन असल्याने यंदा कुठलही धार्मिक कार्यक्रम अथवा शोभा यात्रा आयोजित करणार नसल्याचे सर्वांनी यावेळी जाहीर केले. सर्वप्रथम आ. गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मधील यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करून सर्वाना यात्रा अथवा कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले.


अनेक  वर्षांची परंपरा असलेल्या  शोभायात्रा रद्द केल्याचे  माहिती यावेळी सर्व मंडळाच्या अध्यक्ष, प्रतिनिधींनी जाहीर केले. तसेच काही संस्था या निधीतून स्वचातेच्या साधनाचे वाटप करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.


जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी सर्वाचे आभार मानले. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी वयक्तिक काळजी घेण्याबरोबरच जनजागृती करावी असे आवाहन केले.  तसेच जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचना अथवा आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले.


सर्व मॉल्स चालकांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा फरशी, अन्य साहित्य निर्जंतुक करावे. ज्या वस्तूंना नागरिकाचा स्पर्श होणार आहे ती ठिकाणे वारंवार स्वच्छ करण्यात यावी. नागरिकांना सानिटाय्झेर उपलब्ध करून द्यावे. तसेच हात धुण्यासाठी साबण, पाणी पुरेसे उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी. मॉल्स मधील कर्मचारी देखील व्यवस्थित स्वच्छता पाळत असल्याचो सर्वांनी खात्री करावी.


ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रवासी कंपन्या मार्फत विविध देशात जाण्यासाठी नागरिकांनी नोदणी केलेली आहे. अनेकजण परदेशी गेलेले आहेत. किवा जावून आले आहेत किवा जाणार आहे अशा सर्व नागरिकांची माहिती त्यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी यावेळी दिले. या प्रवाशांची यादी मिळाल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून काळजी घेता येईल. त्यामुळे या कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील व्यायामशाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांनी या आदेशांचे काटेकोर पालन करावे, उलंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  करोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी  करू नका असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.