राममंदिर निर्माणाच्या ट्रस्टवर एका शिवसैनिकाची नियुक्ती करावी - आमदार प्रताप सरनाईक

राममंदिर निर्माणाच्या ट्रस्टवर एका शिवसैनिकाची नियुक्ती करावी - आमदार प्रताप सरनाईक



ठाणे, 
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने राममंदिराचा विषय लावून धरला. त्यामुळे या मंदिर निर्माणाच्या ट्रस्टवर एका शिवसैनिकाची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर व्हावे ही शिवसेनेची पहिल्यापासूनच प्रखर भूमिका आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी पतनाची जबाबदारी स्वीकारून ही भूमिका अत्यंत ताकदीने पुढे नेली. राममंदिर निर्माणाच्या आंदोलनात शिवसैनिकांचे योगदान कधीही विसरता  येणार नाही. 
अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एका ट्रस्टची स्थापना केली असून त्यात १५ जणांची नेमणूक केली आहे. या ट्रस्टींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत, परंतु हा ट्रस्ट स्थापन करताना रामजन्मभूमी आणि मंदिर निर्माण आंदोलनात शिवसेनेने दिलेल्या योगदानाचा केंद्रातील मोदी सरकारला विसर पडला आहे, अशी खंत आमदार सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सरनाईक यांनी याबाबत अनेक मुद्दे मांडून राममंदिर निर्माण आंदोलनात शिवसेनेने दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत या ट्रस्टवर एका शिवसैनिकाला नेमावे, अशी मागणी केली आहे.
बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरून देशभरात वादळ उठले, परंतु प्रखर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवली. राममंदिराच्या निर्माणासाठी झालेल्या आंदोलनात आणि आजवरच्या प्रवासात हजारो शिवसैनिकांचे योगदान आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही राममंदिराबाबत स्पष्ट भूमिका घेऊन केंद्र सरकारकडे मंदिर उभारण्यासाठी वेळोवेळी परखड व रोखठोक भूमिका घेतली. केंद्र सरकारने अध्यादेश काढून राममंदिर बांधण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी सातत्याने राममंदिराचा विषय लावून धरला होता. २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन 'पहले मंदिर फिर सरकार', अशी घोषणा देत त्यांनी राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.