किरकोळ दुकानदारांकडून संचारबंदीचा गैरफायदा - ठाण्याच्या महापौरांचा कारवाईचा इशारा
ठाणे :
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ात कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भागांत दुकानदारांकडून जादा दराने या वस्तू तसेच मालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या हतबलतेचा दुकानदारांनी गैरफायदा घेऊ नये व मालाची आहे त्या दरातच विक्री करावी. नागरिकांकडून दुकानदारांबाबत शिवसेना शाखेत किंवा स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या तर नाईलाजाने संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी लागेल असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
करोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी तसेच टाळेबंदी जाहीर केली आहे. या टाळेबंदीदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यात येतील, असे वारंवार सांगण्यात येत असले तरी, नागरिक आपल्या घरी जास्तीत जास्त मालाचा साठा करण्यावर भर देत आहेत. परिणामी किराणा मालाच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. त्यापैकी काही दुकानदारांनी आता संचारबंदीचा फायदा घेऊन चढय़ा दराने मालाची विक्री सुरू केली आहे.आधी मालाची साठेबाजी करून नंतर तो वाढीव दराने विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीमुळे बाहेर फिरण्यास मनाई असल्यामुळे अनेकजण परिसरातील दुकानांमधुन मालाची खरेदी करीत आहेत. मात्र, त्याचाच फायदा काही दुकानदारांकडून घेऊन चढय़ा दराने मालाची विक्री केली जात आहे. या संदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून त्याची गंभीर दखल घेऊन त्यांनी दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा दुकानदारांची माहिती कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.